वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याने चारशे रुपये दुसरा हप्ता दिला पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन केले. कारखाना मेन गेटवर आंदोलन करण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भागवत जाधव म्हणाले, पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगांव साखर कारखान्यांनी साडेअकरा रिकव्हरी असताना ३४४० रुपये प्रति टनास दर दिला आहे. मगं हुतात्मा साखर कारखाना कां देवू शकत नाही. हुतात्मा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दुसरा हप्ता चारशे रुपये दिला पाहिजे. अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही. अॅड. एस यु संदे म्हणाले, महाराष्ट्रातील हुतात्मा पॅटर्न जागॄत ठेवायचा असेल तर हुतात्मा साखर कारखान्याने दसरा व दिवाळीच्या दरम्यान चारशे रुपये दुसरा हप्ता दिला पाहिजे. आप्पासाहेब पाटील म्हणाले, हुतात्मा साखर कारखाना रिकव्हरीचा गवगवा झाला होता मगं आता रिकव्हरी कमी कां आहे? २०१० ला एफ आर पी पेक्षा दुप्पट दर दिला आहे. मगं आता कां देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना भीक मागायला लावू नये. कार्यकारी संचालक सलगर म्हणाले, हुतात्मा साखर कारखान्याने आगळावेगळा ठसा उमटविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी संचालक मंडळासमोर ठेवेन. बाबासाहेब सांद्रे, प्रकाश देसाई, अभिनंदन नवले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ढोल बजाव आंदोलन मध्ये सहभागी झाले होते.
Sangli: ऊसाला चारशे रुपये दुसरा हप्ता द्या, 'स्वाभिमानी'चे वाळव्यात 'ढोल ताशा' आंदोलन
By अविनाश कोळी | Published: October 02, 2023 4:58 PM