भिलवडी : तासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखाना राज्य बँकेने तात्काळ अवसायक मंडळाच्या ताब्यात द्यावा. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या प्रशसक मंडळाबरोबर बैठक घ्यावी, अशी मागणी कारखाना बचाव समितीच्या शिष्टमंडळाने वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना भेटून केली.कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, श्रीकांत लाड, संजय पाटील, विश्वास जाधव, संजय संकपाळ, बापूसाहेब शिरगावकर, विक्रम पाटील, पोपट पाटील आदींचा समावेश होता. तासगाव कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी अवसायक मंडळाकडे वर्ग करावा, अशी सभासद व कामगारांची मागणी आहे. मात्र कारखाना विक्री करार रद्दबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून बँकेने अवसायक मंडळाकडे कारखाना हस्तांतरित करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. कदम यांनी चालू गळीत हंगामामध्ये तासगाव कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालू व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, कारखाना कार्यस्थळावर रविवार, दि. २० रोजी बैठक बोलाविली आहे. (वार्ताहर)
तासगाव कारखाना अवसायकाकडे द्या,
By admin | Published: July 17, 2014 11:28 PM