सांगली : महाराष्ट्रात सरकारने दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, गावातही दोन उपसरपंच निवडायचे आहेत. कारण गाव पातळीवर राजकीय गट-तट आहेत. वाद मिटवण्यासाठी दोन उपसरपंच निवडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आरळा (ता. शिराळा) येथील सामाजिक कार्यकर्त्या हसिना रमजान मुल्ला यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा परिषदेला पाठवले आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावात अनेक गट असतात, त्यातून अनेकजण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच पद मिळण्याची अपेक्षा असते. सरपंचपद राखीव असेल तर सर्वसाधारण गटाला संधी मिळत नाही. त्यातून अनेकजण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी व काहीवेळा पळवापळवी होते यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो. गावपातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो.दोन गटात भांडणे होतात व त्याचा दुष्परिणाम गावच्या विकासावर होतो. राजकीय वातावरण दूषित होते. त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद करण्याची गरज आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना मर्जीप्रमाणे ग्रामविकासात योगदान देता येईल.जिल्हा परिषदेने निवेदन पाठविले शासनाकडेआरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली होती. प्रशासनानेही निवेदन तत्काळ शासनाकडे पाठविले आहे.
राजकीय तंटामुक्तीसाठी हवेत दोन उपसरपंच, सांगलीतील आरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मुल्ला यांची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: July 15, 2023 12:10 PM