सांगली : ‘आयर्विन’ला समांतर पूल झालाच पाहिजे; पण आ. सुधीर गाडगीळ यांनी पत्र दिल्यानंतर बदललेल्या आराखड्यानुसार नव्हे, तर आधीच्या आखणीनुसारच तो व्हावा. सर्वमान्य पर्याय द्या, अन्यथा पूलच नको! आ. गाडगीळांचा हेकेखोरपणा चालणार नाही, असा घरचा अहेर भाजपचे नेते, माजी आमदार दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. चिंचबनातून जाणाऱ्या पुलाला आणि कापडपेठेतून जाणाऱ्या पुलाच्या जोडरस्त्याला सांगलीवाडीकरांचा कडाडून विरोध असून, जनआंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाचे आयुर्मान संपल्याने त्याला पर्यायी समांतर पूल उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याबाबत सर्वेक्षण केले. नंतर या विभागाने केलेल्या मूळ आराखड्यानुसार पर्यायी पूल ‘आयर्विन’पासून दहा मीटरवर समांतर रेषेत होणार होता आणि थेट सांगलीच्या टिळक चौकात येणार होता. त्यामुळे दुसऱ्या टोकाच्या सांगलीवाडीतील चिंचबनाचे मैदान वाचणार होते. याबाबत सांगलीवाडीच्या लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मात्र नवा आराखडा न दाखवताच, सर्वांना विश्वासात घेताच गुपचूप कारभार सुरू झाल्याचे आता चव्हाट्यावर येत आहे.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी भाजप सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन जुनी आखणी बदलण्याची सूचना केली. त्यानुसार आराखडा बदलला. ‘आयर्विन’पासून दहा मीटरऐवजी ४७ मीटरवर पूल करण्याचे ठरले. सांगलीवाडीतील चिंचबनातून येऊन पांजरपोळ येथे संपणाऱ्या या नव्या पुलाचा मार्ग पुढे कापडपेठेतून जाणार असल्याचा आराखडा मंजूर झाला. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश निघाला. काम सुरू झाले; पण पुढचा धोका सांगलीवाडीकरांनी ओळखला. सांगलीवाडीला एकच मोठे मैदान असून, ते चिंचबन नावाने ओळखले जाते. नवा पूल या मैदानातूनच जाणार असल्याने या परिसराला मैदानच शिल्लक राहणार नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी माजी आमदार दिनकर पाटील यांना सोबत घेऊन कामच बंद पाडले.
या पुलाच्या उभारणीमागील राजकारण, हेतू उघड करीत त्याची गरज, भविष्यातील बाजारपेठेसह वाहतुकीचे नियोजन, व्यवहार्य मार्ग यांची सांगड घालण्याची आवश्यकता ‘लोकमत’ने ‘पुलाखालचे पाणी’ या मालिकेतून मांडली. त्यानंतर शनिवारी माजी आमदार पाटील यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून सांगलीवाडीकरांसह व्यापाऱ्यांच्या भावना मांडल्या.
याबाबत पाटील म्हणाले, ‘समांतर पूर सांगलीवाडीसाठी आवश्यक असल्याचा आणि त्यातून नुकसान होणार नसल्याचा आभास निर्माण करण्यात आला. सुरुवातीला तयार केलेला दहा मीटरवरील पुलाचा आराखडा योग्य होता. तो आम्ही मान्यही केला होता. त्यासाठी हवी ती मदत करू, अशी हमी आम्ही दिली होती. मात्र आ. गाडगीळांनी आम्हाला काहीच न सांगता पत्र दिले आणि आराखडा बदलला.’
‘सांगलीवाडीच्या चिंचबनावर घाला घातल्याने आम्ही काम बंद पाडले. त्यावेळचे सार्वजिनक बांधकाममंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावून घेतले. त्यावेळी तोंडावर विधानसभेच्या निवडणुका असल्याने शांत राहण्यास सांगितले. आम्ही गप्प बसलो, गाडगीळांनीही काही हालचाल केली नाही. आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा ते त्याच नव्या पुलासाठी हटून बसले आहेत. ते चुकीचे वागत आहेत. या पुलामुळे चिंचबनाच्या मैदानाचे आणि सांगलीच्या कापडपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे. समांतर पूल झालाच पाहिजे, पण आ. गाडगीळांनी पत्र दिल्यानंतर बदललेल्या आराखड्यानुसार नव्हे, तर आधीच्या आखणीनुसारच तो व्हावा. आ. गाडगीळांचा हेकेखोरपणा चालणार नाही. चिंचबन आणि कापडपेठेला धक्का पोहोचवणारा पूल होऊ देणार नाही. या नव्या पुलाच्या उभारणीचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन उभारू,’ असा इशारा पाटील यांनी दिला.
चौकट
दक्षिण बाजूचाही विचार झाला पाहिजे होता...
नवा पूल ‘आयर्विन’च्या उत्तरेस होणार आहे. आम्ही दक्षिण बाजूचाही पर्याय सुचविला होता. दक्षिणेस जनावरांच्या बाजाराची मोठी रिकामी जागा आहे. समांतर पुलाचा उतार तेथे झाला असता, तर त्याचा मार्ग टिळक चौक आणि हरभट रस्त्यावरून पुढे नेता आला असता; पण दक्षिणेकडे मंदिरे असल्याचे कारण पुढे करण्यात आले. वास्तविक ‘आयर्विन’चा कमी रुंदीचा समांतर पूल आणि त्या मंदिरांमध्ये अंतर राहिले असते. सध्याही पुलाच्या उतारापासून मंदिरे दूरवरच आहेत, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.
चौकट
जनजागृतीसाठी बैठका सुरू, डिजिटल फलक लागले!
पर्यायी पूल ‘आयर्विन’पासून दहा मीटरवरच व्हावा, याबाबतच्या जनजागृतीसाठी सांगलीवाडीचे नागरिक आणि टिळक चौक, कापडपेठेतील व्यापारी, दुकानदारांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पुलांच्या आराखड्याची वस्तुस्थिती मांडणारे डिजिटल फलक सांगलीवाडीत लावण्यात आले आहेत. टिळक चौक आणि कापडपेठेतही ते लावण्यात येणार आहेत.
चौकट
पुलाची उंची कमी ठेवल्यास पुराचे पाणी गल्ल्यांमध्ये शिरेल
आ. गाडगीळांनी दिलेल्या पत्रात पुलाची उंची बायपास पुलापेक्षा कमी ठेवण्याची सूचना केली आहे. महापुरावेळी ‘आयर्विन’जवळची पाणीपातळी ५८ फुटांवर गेली होती. आता समांतर पुलाची उंची ५० फुटापर्यंत कमी ठेवली, तर पुराचे पाणी तटेल. त्यामुळे गवळी गल्ली परिसरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.
चौकट
या विषयावर माझ्याशी बोलणे नाही!
दिनकर पाटील म्हणतात, या विषयावर आ. गाडगीळ माझ्याशी बोलत नाहीत. त्यांच्याकडे गेलेल्या व्यापाऱ्यांना चर्चा न करता बाहेर काढले. सार्वजनिक जीवनात लोकभावनेचा विचार करून दोन पावले मागे आले पाहिजे.
चौकट
हद्दच ठरलेली नाही
नवा पूल पांजरपोळमार्गे पुढे येणार आहे. मात्र, पांजरपोळ आणि गणपती पंचायतन संस्थानचे केंगणेश्वरी मंदिर यादरम्यानचा रस्ता अजून संस्थानच्या मालकीचा असल्याचे दिसते. त्याच्यावर महापालिकेचे नाव अजून लागलेले नाही. गणपती मंदिराच्या मागच्या बाजूने येणारा हा रस्ता कागदोपत्री ‘पालखी मार्ग’ असून, त्याची हद्दच ठरलेली नाही, असा दावा दिनकर पाटील यांनी केला.