तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन शनिवारी झाले. यानंतर कणेगाव येथे झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य निजाम मुलाणी, स्वाभिमानीचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, महेश पाटील, सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.राहुल महाडिक म्हणाले, जोपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी आहेत, तोपर्यंत महाडिक कुटुंब तुमच्या पाठीशीच राहील.यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस. यु. संदे, डी. के. पाटील, जगन्नाथ पवार, तानाजी पवार, प्रा. शाहू पाटील, शिवाजी पवार, सी. एम. मोरे, मुरलीधर मांगलेकर, संतोष पाटील, संतोष शेळके, गुंडाभाऊ आवटी, सुदर्शन वाडकर, प्रेम उपाध्ये व कार्यकर्ते उपस्थित होते.शत्रुराष्टÑाकडून साखर आयात कशासाठी?शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडण्यासाठी भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. देशात साखरेचे उत्पादन असताना शत्रुराष्ट्राकडून साखर कशासाठी आयात केली? यामुळेच भारतातील साखरेचे भाव गडगडले आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.
इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठालाही न्याय देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:08 PM