सांगली , दि. ३ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पणअंतर्गत गुणांकन करण्यात येत आहे. त्यामध्ये जो जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त आहे, त्या जिल्ह्याने शौचालये किती बांधली, त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले आहे का?, शौचालयाचा वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाकडून किती जनजागृती झाली, शौचालय बांधकामाची किती छायाचित्रे आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर अपलोड केली आहेत.
प्रत्येक जिल्ह्याला काम होईल, तशी माहिती आॅनलाईन रोज भरावी लागत होती. या सर्व कामांचे मूल्यमापन करून स्वच्छता दर्पणमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया जिल्ह्यांचा दिल्लीत दि. २ आॅक्टोबर रोजी गौरव करण्यात आला. स्वच्छता दर्पण आॅनलाईन गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण त्यांनी मिळविले आहेत. सांगली जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधली आहेत. म्हणूनच सांगली जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर प्रथमपासून टिकून राहिला.
‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातत्य ठेवल्याप्रकरणी ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार देऊन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा सोमवारी केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस.अहलुवालिया यांच्याहस्ते गौरव केला.
अहलुवालिया यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरवही केला आहे. जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याच्या मोहिमेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि त्यांचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याच्या प्रतिक्रिया सरपंचांनी व्यक्त केल्या.