कुंडल : जागतिकीकरणामुळे माणसाचे मूल्य कमी होऊन पैशाचे मूल्य वाढले आहे. यामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच होत आहेत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.ज्येष्ठ महिला विचारवंत डॉ. पुष्पा भावे यांचा यावेळी ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, आजवर अनेक मोर्चे निघाले, तरीही शासन त्यावर कायमस्वरूपी उत्तर शोधत नाही. शासकीय योजना कागदोपत्री चांगल्या आहेत; परंतु त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत. राजकीय पक्ष धर्म आणि जातीच्या नावाने समाजाला झुंजवत आहेत, त्यामुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. यामध्ये तरुण पिढी भरडली जात आहे. यांत्रिकीकरणामुळे बेकारी वाढत आहे. ही बेकारी जागतिकीकरणाचाच एक भाग आहे. त्यामुळे राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाही असणे आवश्यक आहे. आर्थिक लोकशाही असेल तर, आर्थिक विषमता दूर होईल. आर्थिक लोकशाहीमध्ये देश कमी पडल्यामुळे आज मोर्चे निघत आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या ही याच आर्थिक लोकशाही न मिळाल्याचा परिणाम आहे, असे सांगून त्यांनी कृष्णाकाठी अनेक महान व्यक्ती घडल्या, त्यातीलच जी. डी. बापू एक आहेत. अकुशल कामगारांना न्याय देण्यास जी. डी. बापू यांनी दिलेला लढा श्रेष्ठ होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी क्रांतिअग्रणी पुरस्काराची भूमिका मांडताना क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, या व्याख्यानमालेमुळे लोकप्रबोधनाचा जागर सुरू केला. यातून क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना अपेक्षित असा समाज घडेल, अशी अपेक्षा आहे. जी. डी. बापू यांची सामाजिक चळवळ सुरू ठेवणारे आणि भौतिक गोष्टींचा त्याग करणाºया व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, असे त्यांनी सांगितले.यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, प्रकाश लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सचिन कदम, सुभाष पवार, दिलीप देशमुख, वासंती मेरू, भास्कर सावंत, प्राचार्य पी. आर. पवार, प्रा. बाबूराव गुरव, जे. बी. पाटील, नथुराम पवार, पी. पी. कुंभार, प्रा. के. एम. नलावडे, राजेंद्र लाड, रणजित लाड, सरपंच प्रमिला पुजारी, संजय संकपाळ, नंदाताई पाटील, आनंदराव जाधव, कुमार शिंदे, सुभाष पवार उपस्थित होते.डॉ. प्रताप लाड यांनी मानपत्र वाचन केले, श्रीकांत लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ गुंड यांनी आभार मानले.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह : भावेसत्काराला उत्तर देताना डॉ. पुष्पा भावे म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मराठा आरक्षण मिळाले; परंतु त्याच्या भविष्याविषयी आजही प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आहे. असे अनेक प्रश्न आज सर्वत्र भेडसावत आहेत. यासाठी जनतेतून उद्रेक होणे आवश्यक आहे आणि हा उद्रेक इतरांपासून होण्याची वाट न बघता तो स्वत:पासून करावा. प्रत्येकाने फक्त स्वत:चा विचार न करता समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, अशी भूमिका ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिकीकरणामुळे माणसापेक्षा पैशाचे मूल्य वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:42 PM