सांगली : लहरी हवामानाने जिल्ह्यातील नागरिकांना गेले वर्षभर हैराण केले आहे. ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यामध्ये पारा चढत आहे. जुलैच्या सरासरी तापमानापेक्षा सध्या कमाल तापमान ४ ने तर किमान तापमान २ अंशाने अधिक आहे.
लहरी हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. ऊन, वारा, पाऊस, धुके, थंडी, ढगांची दाटी अशा वेगवेगळ्या स्वरुपात वातावरण सातत्याने बदलत आहे. यंदा पावसाळा वेळेत सुरु झाला, मात्र जूनच्या अखेरीस त्याने दम टाकला आणि दडी मारली. उकाडा घेऊन जुलै उजाडला. पहिला आठवडा पावसाविना गेला, मात्र जुलैने ताप वाढवला. पारा अचानक वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या चार दिवसात उन्हाळ्यासारखी तीव्रता नागरिकांना जाणवली. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत आहे. गुरुवारी कमाल तापमान ३३ तर कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विक्रमाच्या जवळपास हे तापमान गेले आहे.
चौकट
जुलैमधील कमाल तापमानाचे रेकॉर्ड
अंश सेल्सिअसमध्ये
तारीख तापमान
१६ जुलै १९६८ ३५.८
१ जुलै २०१४ ३४.६
१५ जुलै २०१५ ३३.५
८ जुलै २०२१ ३३.३
११ जुलै २०१२ ३२.७
चौकट
जुलैमधील किमान तापमानाचे रेकॉर्ड
अंश सेल्सिअसमध्ये
तारीख तापमान
३१ जुलै २०१५ २७.३
२६ जुलै २०१२ २६.५
१६ जुलै २०११ २५.२
२४ जुलै २०१४ २४.६
२५ जुलै २०१० २४.५
चौकट
तापमानात होणार घट
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या सहा दिवसात कमाल व किमान तापमानात घट होणार आहे. कमाल तापमान ३० अंशापर्यंत तर किमान तापमान २१ अंशापर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे उकाडा काहीअंशी कमी होण्याची शक्यता आहे. पावसाच्या अंदाजावर तापमानाचे भवितव्य आहे.
कोट
आरोग्याची काळजी घ्यावी
या काळात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. श्वसनविकार तज्ज डॉ. अनिल मडके यांनी सांगितले की, या मोसमात जिवाणूजन्य व विषाणूजन्य आजार वाढतात. फ्लू, डेेंग्यूचे आजारही दिसून येतात. तापाचे आजार वाढले आहेत. खोकला, गॅस्ट्रोसारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे घरातले जेवण खाणे, कोल्ड्रिंक्स टाळणे, घराभोवती पाणी साचू न देणे याबाबत दक्षता घ्यावी.