कोकरुड : कोरोना विषाणु कायमचा निघुन जावा यासाठी ग्रामीण भागातील वाकुर्डे बुद्रुक येथील रोजगार करणाऱ्या महिलांनी कोरोना जा जा हे गीत गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना रोगाची सर्वांना भीती लागून राहिली आहे. कोरोना होऊ नये म्हणून सोशल डिस्टिंगशन, मास्क, हँड ग्लोज, सैनीटाइजर, यांचा वापर वाढला असून स्वच्छतेचे महत्व वाढले आहे. तरीही कोरोना रोगाचा संसर्ग कमी झालेला नाही.
याला कंटाळलेल्या वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथील रोजंदारी करुन पोट भरणाऱ्या निर्मला किसन येवले, माया राजाराम कांबळे, सुशीला भावोजी कांबळे, लक्ष्मी नामदेव कांबळे, शांताबाई लक्ष्मण कांबळे, राणी तानाजी कांबळे या महिलांनी शेतात काम करत करत हे गीत गाईले आहे.
ग्रामीण भागातील रोजगार करणाऱ्या या महिलांनी कोरोना विषाणुवर गाणे रचुन निर्मला येवले यांच्या सुरात सुर मिळवून आपल्या कोरोना बद्दल असलेल्या भावना या गितातून व्यक्त केल्या आहेत. निर्मला येवले आणि त्यांच्या सहकारी महिलांनी गायिलेले हे गीत सद्या लहानापासुन मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या मुखातून गायिले जात आहे.
वाकुर्डे बुद्रुक मधील रमाबाई महिला बचत गटाच्या आम्ही सदस्या असून वर्षभर वेगवेगळ्या कामावर रोजंदारीसाठी जात असतो. यापूर्वी काम करत विविध सण यावर गाणी रचली आहेत. आम्ही जिथे कामाला जायचो, तिथे कोरोनाचीच चर्चा कानी पडत असे, यातून आम्ही कामे करत करत या गीताची रचना केली.-सुशीला कांबळे, वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा).