संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई झाली.
संशयित हर्षद नागनाथ जाधव, गणेश अशोक जाधव व संदेश शिवाजी पवार (तिघेही रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या झडतीमध्ये गोवा बनावटीच्या दारुच्या ३४८ बाटल्या सापडल्या. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे महामार्गावर पथकर नाक्याजवळ सापळा लावला होता. त्यावेळी एक चारचाकी (एमएच ०३ एझेड ५८३६) संशयावरुन थांबविण्याचा प्रयत्न पथकाने केला. ती न थांबल्याने पाठलाग करुन अडविण्यात आली. तपासणीमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या. गाडीतील हर्षद व गणेश या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी सांगितले की, ही दारु भेसळ करुन अन्य बाटल्यांमध्ये भरुन सील केली जाणार होती. त्यानंतर ग्राहकांना विकण्यात येणार होती. पाचेगावमध्ये एका घरात हे काम केले जाणार होते.
पथकाने तातडीने पाचेगावमध्ये धाव घेऊन संबंधित घराची झडती घेतली, तेथे तिसरा संशयित संदेश पवार सापडला. शोधमोहिमेत गोवा व महाराष्ट्र राज्यांत विकल्या जाणाऱ्या दारुच्या काही रिकाम्या बाटल्या, बुच, काही भरलेल्या बाटल्या सापडल्या. पथकाने वाहनासह दारु व अन्य मुद्देमाल जप्त केला. त्याची एकूण किंमत ८ लाख ५१ हजार ७५० रुपये होते.कारवाईत निरिक्षक दीपक सुपे, शरद केंगारे, इरफान शेख, संतोष बिराजदार, स्वप्नील आटपाडकर, कविता सुपने आदींनी भाग घेतला.