दिलीप मोहितेविटा : परराज्यातील दारूची तस्करी व विक्री करण्यासाठी साठा केलेल्या गोवा बनावटीच्या दारू गोदामावर विटा उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे ५ लाख ८ हजार १५७ रूपये किंमतीची दारू जप्त केली. याप्रकरणी संकेत शिवकुमार साळुंखे (वय १९), आशुतोष हिंदुराव साळुंखे (२४, दोघेही रा. जाधवनगर, आंधळी, ता.पलूस) व अनिकेत धनाजी कांबळे (२५, रा. शिरगाव, ता.तासगाव) या तीन संशयितांना गजाआड करण्यात आले. विटा शहराजवळील आळते फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.विटा ते तासगाव रस्त्यावरील आळतेफाटा (लिंब) येथील शिवराज ढाबाच्या पाठीमागे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी व विक्री होत असल्याची माहिती विटा उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानंतर सांगलीच्या उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विटा विभागाचे दुय्यम निरीक्षक वि. ओ. मनाळे, दुय्यम निरीक्षक एस. आर. कोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दिलीप सानप यांनी कर्मचाऱ्यांसह आळते फाटा येथे छापा टाकून तीघांना ताब्यात घेतले.
यावेळी संशयित संकेत व आशुतोष या दोघांनी गोवा बनावटीच्या दारूचा त्यांच्या जाधवनगर, आंधळी येथील राहत्या घरी साठा केल्याची माहिती दिली. त्यानंतर संशयितांना घेऊन उत्पादन शुल्कचे अधिकारी संकेत व आशुतोष यांच्या घरी गेले. तेथे विविध प्रकारच्या ३ हजार ३९६ गोवा बनावटीच्या दारूच्या ५ लाख ८ हजार १५७ रूपये किंमतीच्या सीलबंद बाटल्या सापडल्या. त्याचबरोबर बाटल्यावर लावण्यात येणारे बनावट लेबलही जप्त केले. उत्पादन शुल्कच्या विटा विभागाचे निरीक्षक वि. ओ. मनाळे पुढील तपास करीत आहेत.