कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड एम (ता.कवठेमहांकाळ) येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या थांबलेल्या मोटारीला पाठीमागून आलेल्या मोटारीने जोराची धडक दिली. त्यामुळे एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.गौरी गुरुदास कुडाळकर (वय ६०, रा. अस्नोडा, ता. बार्देश, गोवा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर मोटारचालक शाबाजी राजेंद्र गाड (वय ३०, रा. डिचोली, गोवा) व सुरेखा शिरोडकर (वय ६०, रा.फटरीवाडा रेवोडा, बार्देश, गोवा) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.गौरी कुडाळकर आणि त्यांचे सहकारी गोवा येथून पंढरपूरकडे मोटारीतून (जीए ०३ वाय ६१३६ देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर अलकूड एम हद्दीतील रत्ना पेट्रोल पंपासमोर पाठीमागून येणाऱ्या सहकाऱ्याची वाट बघत सर्वजण मोटारीत बसले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटार (टीएस ०७ जेएल ३३३९)च्या चालकाचा ताबा सुटल्याने थांबलेल्या मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मोटारीतील गौरी कुडाळकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले. ही धडक इतकी जोरात होती की थांबलेली मोटार दीडशे फूट फरफटत गेली.अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालक हर्षित भास्कर पोरेड्डी याच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पद्माकर मधू वायंगणकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करीत आहेत.
Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 11:55 AM