सांगली : एका दिवसात तब्बल १ लाख नागरिकांना कोरोना डोस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठेवले आहे. येत्या बुधवारी (दि. १५) हा प्रकल्प यशस्वी करण्यात येणार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लसीकरणाने वेग घेतला आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत आहे. २१ ऑगस्ट रोजी तब्बल ४६ हजार १४६ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली होती. गेल्या महिनाभरातील हे सर्वाधिक लसीकरण आहे. आता एकाच दिवसात एक लाख डोस टोचण्याचे उद्दिष्ट डुडी यांनी निश्चित केले आहे. शासनाकडून एकावेळी ५० ते ७५ हजार डोस मिळू लागले आहेत. मुबलक पुरवठ्याचा फायदा घेत साताऱ्याने गेल्या आठवड्यात एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण यशस्वी केले, तोच पॅटर्न सांगलीतही राबविण्याचे उद्दिष्ट आहे.
चौकट
लसीकरणासाठी १०२ केंद्रे
रविवारीच्या (दि. १२) नोंदीनुसार १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यापैकी ९७ शासकीय केंद्रे, तर ५ खासगी आहेत. यापूर्वी कमाल २७७ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. एक लाख लसीकरण एकाच दिवसात साध्य करायचे, तर त्यासाठी केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. मनुष्यबळदेखील उपलब्ध करावे लागेल. त्याची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे.
चौकट
जत तालुक्याचा अडसर
लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात जत तालुका अडसर ठरत आहे. तेथे फक्त ४० टक्के लसीकरण झाले आहे. अनेक केंद्रांवर कोरोनाची लस शिल्लक राहत आहे. लसीकरणासाठी लोक पुढे येईना झालेत. लोकप्रतिनिधींनीही नागरिकांवर लसीकरणासाठी दबाव टाकलेला नाही. लाखाचे उद्दिष्ट गाठण्यात जत तालुका अडसर ठरण्याची चिन्हे आहेत.
चौकट
जिल्ह्यात १८ वर्षांवरील लाभार्थींची संख्या साडेअठरा लाख आहे. प्रत्येकाला दोन डाेस यानुसार ३७ लाख डोस टोचावे लागतील. आतापर्यंत १९ लाख ६० हजार ४०७ जणांना लस टोचली आहे. १४ लाख १५ हजार ३३४ जणांना एक, तर ५ लाख ४५ हजार ७३ जणांना दोन डोस देण्यात आले आहेत.