नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. तर दुसऱ्या शेळीचा भीतीने मृत्यू झाला. नेर्ले परिसरात वारंवार बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन अधिकाऱ्यांनी तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
येथील महामार्गाच्या पश्चिमेला बन नावाचे बीर देवाचे ऐतिहासिक देवस्थान आहे. या ठिकाणी लोकवस्ती आहे. पैलवान प्रकाश आंब्रे यांची वस्ती या ठिकाणी आहे. त्यांचे बंधू धनाजी आंब्रे हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी कुरण परिसरात गेले होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान शेळ्या चारत असताना ऊसातून आलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ऊस पिकात ओढत नेले. या प्रकाराने भयभीत झालेले आंब्रे व अन्य शेतकऱ्यांनी शोध घेतला परंतु बिबट्याचा मागमूस लागला नाही.
या हल्ल्यामुळे आंब्रे यांची एक शेळी सोमवारी रात्री भयभीत झाल्याने मरण पावली. यामध्ये आंब्रे यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी व बिबट्याचा बंदोबस्त करावाण अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी दिला आहे.