सांगली : श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावर गोमटेश्वर भगवान बाहुबली यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन १०३८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुरुवारी भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक करण्यात आला. चारुकीर्ती भट्टारक स्वामींच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावर गंगवंशी साम्राजाचे सेनापती चामुंडराय यांनी ९८१ मध्ये भगवान बाहुबलींची ५७ फूट उंच मूर्ती निर्माण केली होती. भगवान बाहुबलींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन गुरुवारी २२ मार्च रोजी १०३८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त बाहुबलींच्या मूर्तीवर पहाटे पाच वाजता भाविकांच्या उपस्थितीत मस्तकाभिषेक करण्यात आला.
उदय शास्त्री, नंदकुमार शास्त्री, वृषभ पंडित, आदिनाथ पंडित यांनी मंत्रोच्चार केले. चारुकीर्ती भट्टारक स्वामी, आचार्य वर्धमानसागर महाराज, अमोघकीर्ती महाराज, अमरकीर्ती महाराज, आचार्य चिन्मयसागर महाराज, महामस्तकाभिषेक महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन, सचिव सुरेश पाटील यांनी मूर्तीवर अभिषेक केला. उसाचा रस, केसर, चंदन, दूध, अष्टगंध आदींनी अभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली. चारुकीर्ती महाराजांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले.