माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे राजकीय वारसदार म्हणून ते सुपरिचित होते. देशमुख साहेब म्हणजे शिराळा डोंगरी भागात सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व होते. डोंगरी परिषद घेऊन त्यांनी अनेक तालुक्यांना डोंगरी विभागाचा लाभ मिळवून दिला. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचे प्रभावीपणे काम केले. विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गाैरविण्यात आले हाेते. अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य राहिले होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. सत्तेच्या राजकारणात त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाप्रर्यंत विकासाची गंगा पोहोचवली. राजकारणालाही आदर्श दिशा देण्याचे काम त्यांनी केले. शिवाजीराव देशमुख म्हटले की साहेब आणि साहेब म्हटले की शिवाजीराव देशमुख असे समीकरण गेली अनेक दशके सांगली जिल्ह्याच्या राजकारणात होते. त्यांचे फक्त असणे ही सुद्धा अनेक कार्यकर्त्यांसाठी ताकद होती. ते आता आपल्यात नाहीत, ही कल्पना अनेकदा मनाला पटत नाही.
सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही योगदान दिले. त्या योगदानात स्वत: साहेबांचाही जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागतो. साहेब मितभाषी, उच्चशिक्षित होते. १९६७ पासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये थांबला. साहेबांनी राजकारणात राहून स्वत:लाही जपले आणि जनतेलाही. साहेब प्रतिभासंपन्न नेतृत्व होते. त्यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. या महामानवाची आज द्वितीय पुण्यतिथी. अशा या "माणसातल्या देवमाणसास" विनम्र अभिवादन...
- शिवाजी पाटील, येळापूर