सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीच्या पूजेच्या साहित्यावर डल्ला मारला. चार हजार सातशे ग्रॅम वजनाची ही भांडी आहेत. त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.
हरिपूरचे बागेतील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज दर्शनासाठी गर्दी असते. मंदिराचे पुजारी मयुरेश ताम्हणकर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मंदिर बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरटे थेट गाभाºयात गेले. तिथे लोखंडी कपाट बंद होते, पण त्याला कुलूप घातले नव्हते. त्यामुळे चोरट्यांना ते सहज उघडता आले. यातील चांदीचा किरीट, घंटा, तांब्या, पळी, भांडे, उंदीर, छत्र, अभिषेक पात्र, पंचारती अशी चार हजार सातशे ग्रॅम वजनाची पूजेची भांडी लंपास केली. कपाटात लॉकरमध्ये चिल्लर व रोकड होती. पण चोरट्यांना लॉकर उघडता न आल्याने ते सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाच वाजता ताम्हणकर मंदिरात पूजा करण्यासाठी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान हरिपूरच्यादिशेने रामकृष्ण वाटिकेपर्यंत गेले. तिथेच ते बराचवेळ घुटमळले. ठसे तज्ज्ञांना महत्त्वाचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. मंदिरात चोरी झाल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी ताम्हणकर यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू माळी तपास करीत आहेत.दान केलेले साहित्यचोरट्यांनी लंपास केलेले पूजेचे साहित्य भाविकांनी दान केलेले आहे. मध्यरात्री दोन ते तीन या वेळेत चोरी झाली असण्याची शक्यता आहे. चोरटे दोन किंवा तीन असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांना मंदिरातील माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी अगदी सहजपणे चोरी केली. हरिपूर रस्त्यावर कुठे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का, याची पोलिसांनी तपासणी सुरू ठेवली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज मिळाल्यास चोरट्यांचा माग काढणे शक्य होणार आहे.