राजेंद्र खामकर ल्ल अंकलखोप पलूस तालुक्यातील अंकलखोप जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, अंकलखोप गट सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला झाला असल्याने उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. त्यामुळे येथे इच्छुकांची भाऊगर्दी असणार आहे. अंकलखोप पंचायत समितीचा गण सर्वसाधारण महिला वर्गासाठी खुला झाल्याने, अनेक मातब्बर महिला तिकिटासाठी आघाडीवर राहणार आहेत. त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. यावेळची निवडणूक कदाचित तिरंगी होण्याची शक्यता असून, कॉँग्रेस व भाजप, राष्ट्रवादी ताकद अजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील निवडणुकीमध्ये कॉँग्रेसने गट व गण जिंकला होता. राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली होती. त्यावेळी जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव, तर पंचायत समिती गण खुला होता. यावेळी उलट परिस्थिती आहे. पलूस तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट यावेळी कमी झाल्याने, बुर्ली गाव अंकलखोप गटामध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळेच निवडणुकीमध्ये चुरस होणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेचे तिकीट मोठी मतदारसंख्या असणाऱ्या गावाला व पंचायत समिती गणाचे तिकीट कमी मतदारसंख्या असणाऱ्या गावाला, अशी आतापर्यंतची वाटणी होती. यावेळी पक्ष कोणत्या प्रकारे उमेदवारी वाटप करणार, हे लवकरच समजणार आहे. मागील निवडणुकीत जि. प.चे तिकीट अंकलखोप गावाला व पं. स. गणाचे तिकीट नागठाणे गावाला, अशी वाटणी केली होती. यावेळची समीकरणे कदाचित बदलतील, असे चित्र दिसत आहे. बुर्ली हे गाव पूर्वीच्या दुधोंडी जि. प. गटात होते. या गावाचे राजकारण हे वेगळ्या स्वरूपाचे असल्याने, हे गाव अंकलखोप गटाला जोडल्यामुळे कोणत्या पक्षाला त्याचा फायदा मिळणार, ते या निवडणुकीत समजणार आहे. अंकलखोप जि. प. गटासाठी अंकलखोप, संतगाव, सूर्यगाव, नागठाणे, धनगाव, आमणापूर, व बुर्ली ही गावे येतात. यामध्ये आमणापूर व अंकलखोप असे दोन गण येतात. अंकलखोप पंचायत समिती गणामधून नागठाणे किंवा बुर्लीमधून महिला उमेदवार निवडीबाबत चाचपणी सुरु आहे. आमणापूर गणामधूनही चाचपणी सुरु आहे. आमणापूर गणही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तिन्ही पक्षांमध्ये सध्या चुरस असून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणुकीत उडी घेण्याची शक्यता आहे.
अंकलखोप गटात इच्छुकांचे देव पाण्यात
By admin | Published: October 21, 2016 1:33 AM