अतुल जाधवदेवराष्ट्रे : शिवशंकराचे पुरातन देवस्थान असलेल्या श्री सागरेश्वर मंदिरातील मुख्य पिंडीवर १८ किलो चांदीची पिंड बसवली जाणार आहे, तर मुख्यपिंडीचे लिंग सोने, चांदी व पितळची तयार केली आहे, त्यामुळे सागरेश्वर देवस्थानमधील मुख्य पिंडीला आता चांदीचे तेज येणार असून, मुख्यपिंडीचे लिंग सोन्याने मडवले जाणार असल्याची माहिती सागरेश्वर उत्कर्ष मंडळाचे सदस्य मोहन भोसले यांनी दिली.श्री सागरेश्वर देवस्थान येथे १०८ शिवलिंग असून, येथे पाच ऋषीमुनींच्या जिवंत समाधी आहेत. हेमाडपंथीय असलेल्या या मंदिरातील शिवलिंग पुरातन असून, या शिवलिंगाची रचना सुलभ असून या लिंगाखाली नेहमी पाणी असते. यामुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सागरेश्वर उत्कर्ष मंडळांनी येथील पिंड व लिंग चांदी सोन्याने मडविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शिवभक्तांनी देणगी स्वरूपात चांदी व सोने दान केले.या माध्यमातून मंडळाने १८ किलो २०० ग्रॅम चांदीची पिंड तयार केली असून, ही पिंड सागरेश्वर मंदिरातील मुख्य पिंडीवर बसवण्यात येणार आहे. या पिंडीवर जे लिंग आहे ते लिंग पितळ व सोन्यापासून तयार केले आहे.
एक ऑगस्ट'ला सोहळा..सागरेश्वर उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून मुख्यपिंड चांदीची करण्यासाठी देणगी गोळा करत आहेत. याला आता पूर्णत्व प्राप्त झाले असून एक ऑगस्ट रोजी हा सोहळा होणार असून हा सोहळ्याच्या माध्यमातून या पिंडीवर चांदीची पिंड अर्पण करण्यात येणार आहे.