मुंबई : सोन्याच्या तस्करी प्रकरणात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील एका तरुणाला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे अटक केली आहे. त्याच्याकडून दोन कोटी नऊ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. योगेश राजेंद्र गायकवाड असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुबईतून तस्करीच्या मार्गे भारतात आलेले सोने उत्तर प्रदेशात विकण्याचे काम काही तरुण करत असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. हे सोने घेऊन एक तरुण वाराणसी येथून लखनौला रस्तेमार्गे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. या रस्त्यावर सुलतानपूर येथे जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना हा तरुण सोन्यासह आढळून आला. अधिकाऱ्यांनी त्याला या सोन्याबद्दलच्या कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, तो कोणतीही कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.