स्वप्नील शिंदे ।सातारा : आपल्या मुलीने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करून नाव कमवावे, असे स्वप्न पाहिलेल्या बाबांनी अवघ्या चौथ्या वर्षीच आर्याच्या हाती बॅडमिंटनचे रॅकेट दिले. त्याच छोट्याशा आर्याने नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून बाबाचं स्वप्न पूर्ण केलं. परंतु हेच यश पाहण्यासाठी तिचे बाबा आज या जगात नाहीत.
एखाद्या चित्रपटातील गोष्ट असावी, असा जीवन प्रवास आहे साताऱ्यातील गुरुकुल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाºया आर्या देशपांडे या राष्ट्रीय बॅडमिंटनपटूचा. तिचे वडील राहुल देशपांडे यांचा बांधकाम क्षेत्राचा व्यवसाय होता. त्यांना दोन मुली. मोठी अनुष्का आणि धाकटी आर्या. दोघींनी क्रीडा क्षेत्रात यश मिळवावे, असे त्यांचे स्वप्न होते.
दोघींना लहानपणापासून खेळात गती असल्याने सुरुवातीला त्यांना फूटबॉल, बास्केटबॉल, टेबलटेनिस अन् त्यानंतर बॅडमिंटन खेळासाठी प्रोत्साहन दिले. अवघ्या चौथ्या वर्षी तिच्या हाती बॅडमिंटनचे रॅकेट दिले. त्यानंतर तिने ते कधी खाली ठेवलेच नाही. क्रीडा शिक्षक मनोज कानरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील प्रत्येक स्पर्धेत ती जिंकत होती.
आर्याला राष्ट्रीय अन् आतंरराष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागल्याने तिच्या बाबांनी तिला मुंबईतील प्रशिक्षक उदय पवार यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. त्यासाठी त्यांनी सुरळीत सुरू असलेला आपला साताºयातील बांधकाम व्यवसाय बंद करून मुंबईत मुक्काम केला. आई आणि मोठी बहीण साताºयात. तर बाबा आणि आर्या मुंबईत, अशा प्रकारे कसरत करत ती प्रशिक्षण घेत होती. मात्र, काळाच्या मनात वेगळेच होते. नोव्हेंबर २०१७ मध्ये अचानक राहुल देशपांडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
या घटनेनंतर आर्याला हादराच बसला. कारण बाबा तिच्यासाठी सर्वस्व होते. मित्र, प्रशिक्षक आणि खेळाडू अशा विविध भूमिकांमुळे दोघांचे एकमेकांशी बाप-लेकीपेक्षा वेगळेच नाते बनले होते. प्रत्येक स्पर्धेत ते तिच्यासोबत असायचे. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांची उणीव तिला जाणवत होती. मात्र, तिने स्वत:ला सावरले अन् बाबांच्या स्वप्नांसाठी खेळण्याची जिद्द केली. याच जिद्दीने ती खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत खेळली. तिने पुण्याच्या अनन्या फडकेच्या मदतीने दुहेरी स्पर्धेत राजस्थानच्या संघाचा पराभव केला.
आर्याने चांगले खेळावे म्हणून राहुल हे वयाची चाळीशी ओलांडताना स्वत: बॅडमिंटन शिकले. आर्यासाठी तासन्तास कोर्टमध्ये बसून राहण्याबरोबरच बाहेरगावी प्रत्येक स्पर्धेसाठी ते तिच्यासोबत होते. आर्याने इंटरनॅशनल प्लेअर बनावं म्हणून त्यांनी आयुष्याचं अक्षरश: रान केलं होतं.-रुचा देशपांडे, आर्याची आई