सांगली : सलग २३ वर्षे नागरिकांच्या मनावर प्रदूषणमुक्त उत्सवाची संकल्पना बिंबवत सांगलीच्या डॉल्फिन नेचर ग्रुपने तब्बल ४५० टन निर्माल्य नदीत जाण्यापासून रोखले. याशिवाय मूर्तीदान संकल्पनाही त्यांनी रुजविल्याने हा उपक्रम राज्यभरात चर्चेत आला आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीचे उत्सव काळात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी २००० मध्ये सांगलीत डॉल्फिन नेचर ग्रुपने जनजागृती सुरू केली. सुरुवातीला फारसा प्रतिसाद न देणाऱ्या नागरिकांनी ही संकल्पना आता स्वीकारली आहे. सध्या बहुतांश निर्माल्य निर्माल्य कुंडात तसेच डॉल्फिनच्या कार्यकर्त्यांकडे सोपविले जाते. मोठ्या प्रमाणावर मूर्तीदानही होत असते. त्यामुळे ही संकल्पना रुजताना नदी प्रदूषण कमी करण्यात ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मोठा हातभार लावला.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रुपचे सदस्य सांगलीतील कृष्णा घाटावर निर्माल्य संकलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सांगली कृष्णा घाटासह, महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी, हरिपूर, बुधगावमध्ये जनजागृती करीत निर्माल्य संकलन करणार आहेत. घाटावर निर्माल्य दान करणाऱ्या गणेशभक्तांनी ते प्लास्टिकमुक्त करावे. कॅरीबॅगसह निर्माल्य दान करू नये, असे आवाहन ग्रुपचे प्रमुख शशिकांत ऐनापुरे यांनी केले आहे.
पंचवीस जणांचे पथक
शशिकांत ऐनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस ते पंचवीस सदस्य निर्माल्य संकलन करतात. निर्माल्य आपल्या घराजवळ बागेमध्ये झाडात विसर्जित करून त्याचे उपयुक्त खतामध्ये रूपांतर आपण करू शकतो. डॉल्फिन संस्थेच्या सातत्यपूर्ण जागृतीमुळे हजारो नागरिक घरच्या मूर्ती व निर्माल्य दान करीत आहेत.
शाडूच्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच मोठ्या भांड्यातही करता येते. यावर्षी पाऊस अतिशय कमी असल्यामुळे नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये. निर्माल्य पाण्यामध्ये न सोडता निर्माल्य संकलन करणाऱ्या डॉल्फिनच्या सदस्यांकडे द्यावे. प्लास्टरची मूर्ती असल्यास मूर्ती विधिवत पद्धतीने दान करावी.- शशिकांत ऐनापुरे, संस्थापक, डॉल्फिन नेचर ग्रुप, सांगली