सांगली : वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अर्थात डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गुड न्यूज दिली आहे. नीट परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेची अट हटविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून संधीचे दरवाजे उघडले आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी ॲण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात नीट परीक्षेसाठी हा दिलासादायी निर्णय झाला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे होती, तर राखीव प्रवर्गासाठी ३० वर्षे वयोमर्यादा होती. ती हटविली आहे. आतापर्यंत वयाच्या पंचविशीपर्यंतच नीट परीक्षा देता यायची. वयोमर्यादेची अट हटविल्याने तिशीनंतरही परीक्षा देता येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी निर्णयाचे स्वागत केले. परीक्षार्थीला किमान १७ वर्षे वयाची अट मात्र कायम आहे.
एमबीबीएस, बीडीएस आणि इतर काही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. देशभरात दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश विविध वैद्यकीय महाविद्यालयांत मिळतो.
१३ भाषांमध्ये होणार परीक्षा
- वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा प्रथमच तेरा विविध प्रादेशिक भाषांत होणार आहे.
- हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.
सामान्य वर्गासाठी २५, तर राखीवसाठी होती ३० ची अट
आतापर्यंत नीट परीक्षेसाठी सर्वसामान्य प्रवर्गाला कमाल २५ वर्षे वयोमर्यादेची अट होती. राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे होती. ती काढून टाकण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला. १७ वर्षांची किमान वयोमर्यादा मात्र कायम आहे.
टेन्शन दूर झाले
वयोमर्यादा हटविल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन दूर झाले आहे. कोणताही दबाव न घेता अभ्यास करता येईल. मर्यादा हटली म्हणून दहा-दहा वर्षे परीक्षा देणे योग्य नसेल. - कैवल्य शिरतोडे, विद्यार्थी, सांगली.
वयोमर्यादा हटविल्याने परीक्षार्थींची संख्या वाढणार आहे. यातून मेरीटसाठी एकेक टक्क्याची स्पर्धा सुरू होईल. वैद्यकीय शिक्षण सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांच्या आवाक्यात राहणार नाही. - शीतल खैरमोडे, विद्यार्थिनी, सांगली.