सांगली : महापालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी ४ हजार ८२१ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर १४७ मुर्त्या दान स्वरूपात जमा झाल्या आहेत. महापालिकेच्या विविध केंद्रात १२ टन निर्माल्य जमा झाले. तर ३३६ मुर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला.महापालिकेने नदीचे प्रदुषण टाळण्यासाठी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड, निर्माल्य व मुर्तीदान केंद्रे उभारली आहेत. पाचव्या दिवशी सांगलीत ३८१० मुर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी १०७ मुर्ती दान करण्यात आल्या. तर ८ निर्माल्य जमा झाले. मिरजेत ४६५ मुर्तीचे विसर्जन झाले असून दीड टन निर्माल्य तर कुपवाडमध्ये ५४६ मुर्तीचे विसर्जन, २९ मुर्तीदान व एक टन निर्माल्य जमा झाले. ३३६ मूर्ती शेततळ्यात विसर्जित करण्यात आल्या आहेत.आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओव्होळ, सांगलीचे उपायुक्त राहुल रोकडे, मिरजेचे चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील यांनी गणेश विसर्जन तयारीचे नियोजन केले आहे. त्यासाठी महापालिकेचे १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी विसर्जन कुंड, कृत्रिम तळ्यात विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सांगली, कुपवाडमध्ये मुर्तीदानाला चांगला प्रतिसाद, १२ टन निर्माल्य जमा
By शीतल पाटील | Published: September 05, 2022 7:23 PM