- सचिन लाडसांगली : ‘गोल्डी’...सांगली पोलीस दलातील पहिला बॉम्बशोधक श्वान...११ वर्षे पोलीस दलात सेवा बजावलेल्या ‘गोल्डी’ने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ‘अलविदा’ घेतला. तो १५ वर्षांचा होता. महिनाभर पोटाच्या विकाराने आजारी होता. निवृत्तीनंतर केवळ तीन वर्षेच त्याला विश्रांती मिळाली. पोलीस दलात त्याला हाताळणारे हवालदार चंद्रकांत मरगाळे यांनीच निवृत्तीनंतर स्वत:च्या घरी त्याचा सांभाळ केला.
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सांगलीत प्रथमच पोलीस दलात बॉम्बशोधक विभाग सुरू झाला. या विभागात लॅब्रेडोर जातीच्या (नर) असणारा गोल्डी हा पहिला श्वान होता. एक वर्ष सात महिन्याचा असताना त्याची पोलीस दलात ड्युटी सुरू झाली. तत्पूर्वी पुण्यात त्याला नऊ महिने प्रशिक्षण देण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोटात ‘जंजीर’ हे श्वान हाताळलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जेकब गायकवाड, हवालदार चंद्रकांत मरगाळे, पोलीस शिपाई डी. पी. गायकवाड हे प्रथम गोल्डीच्या दिमतीला होते. त्याचे खरे नाव ‘गोल्ड’ होते. पण लाडाने त्याला ‘गोल्डी’ म्हटले जात असे. गोल्डी तल्लक बुद्धीचा होता. कामात कधीही त्याने कुचराईपणा केला नाही.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे व सभांवेळी त्याने सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. वासावरुन माग काढण्यास तो तरबेज होता. त्याच्यासमोर सहा ते सात बॅगा ठेवल्या जात असत. यातील आरडीएक्सने भरलेली बॅग तो अगदी सहजपणे ओळखायचा. त्याला फक्त इंग्रजी भाषा समजायची.गोल्डीची ‘सॅल्युट’ मारण्याची पद्धत जबरदस्त होती. पथकाने ‘गोल्डी सॅल्युट’ म्हटले की, तो दोन पाय समोर ठेवायचा. या पायांमध्ये डोके ठेवून सॅल्युट मारायचा. राष्टÑगीत सुरू असेल किंवा ध्वज उतरविण्याची वेळ झाली की, जागेवरच स्तब्धपणे उभा राहण्याचा शिष्टाचार त्याने शेवटपर्यंत पाळला. कुठे बेवारस काही सापडल्यास गोल्डीला नेले जात असे. मुख्य बसस्थानक, रेल्वे स्थानक, गणपती मंदिर, मिरज जंक्शन आदी गर्दीची ठिकाणे दररोज त्याने तपासली. ११ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये गोल्डी निवृत्त झाला. त्याला हाताळणारे हवालदार चंद्रकांत मरगाळे यांनी त्याला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. निवृत्तीनंतर तीन वर्षे त्याला विश्रांती मिळाली. महिनाभर तो पोटाच्या विकाराने आजारी होता. मरगाळे यांनी त्याच्यावर औषधोपचारही केले; पण गुरुवारी पहाटे त्याचे निधन झाले. मरगाळे यांनी घराजवळच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.पाच जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्ट्रिक’कोल्हापूर परिक्षेत्र विभागातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात बॉम्बशोधक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाचही जिल्ह्यातील पोलिसांच्या श्वानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गोल्डीने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाची ‘हॅट्ट्रिक’ केली होती. तसेच तीन ‘गोल्ड मेडल’ व पाच ‘सिल्व्हल मेडल’ही गोल्डीच्या नावावर आहेत.नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात...गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तासगाव येथे सभा झाली. त्यानंतर रत्नागिरी, मालवण येथेही मोदी यांच्या सभा झाल्या. या तीनही सभेच्या सुरक्षेची जबाबदारी अत्यंत शांत स्वभावाच्या गोल्डीने पार पाडली होती. निवृत्तीनंतरही मरगाळे गोल्डीकडून सराव करून घेत होते.