गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद
By अविनाश कोळी | Published: September 20, 2023 09:06 PM2023-09-20T21:06:51+5:302023-09-20T21:08:16+5:30
...त्यामुळे घायाळ समदुखी नेते आपसातील मतभेद विसरून पडळकरांविरोधात एकत्र येण्यासाठी सरसावले आहेत.
सांगली : आक्रमक राजकारणाच्या वाटेवरून अनेकांशी उघड पंगा घेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची सुरू असलेली वाटचाल महायुतीच्या मंडपात कल्लोळ निर्माण करणारी ठरत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस अन् स्वपक्षीय भाजपमध्येही त्यांनी अनेक राजकीय शत्रुंना अंगावर घेतले आहे. त्यामुळे घायाळ समदुखी नेते आपसातील मतभेद विसरून पडळकरांविरोधात एकत्र येण्यासाठी सरसावले आहेत.
पडळकरांचे राजकारण जहाल शाब्दिक टीकांच्या आधारावर टिकले आहे. त्यांच्या अशाच टीकांमुळे राज्याच्या राजकारणात अनेकदा गोंधळ झाला. संतापलेल्या विरोधकांनी त्यांचे पुतळेही जाळले. तरीही त्यांनी त्यांची राजकीय कार्यपद्धती बदलली नाही. शरद पवार, अजित पवार या दोन्ही नेत्यांवर टोकाची टीका करीत राज्याच्या राजकारणात ते चर्चेत आले. राज्यातील नेत्यांना जसे ते अंगावर घेताहेत, त्याच पद्धतीने सांगलीतील सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांशीही त्यांनी पंगा घेतला आहे.
अजित पवारांवर लबाड लांडगा म्हणून टीका करताना त्यांनी महायुतीत मतभेदांचा स्फोट घडवून आणला. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावरही त्यांनी टीका करून मित्रपक्षांना शत्रुपक्षात ढकलून दिले. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांशी त्यांचे सूर कधीच जुळले नाहीत. त्यामुळे आपसांतील मतभेद, पक्षांच्या वेगळ्या वाटा विसरून काही विरोधक पडळकरांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत.
या नेत्यांशी घेतला पंगा
एकनाथ शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांच्याशी त्यांचा राजकीय वैरभाव कायम आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी मैत्रीचा दिखावा केला तरी तो वरवरचा असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे.
- अजित पवारांवरील टीकेमुळे खानापूर - आटपाडी मतदारसंघातील या गटाशी त्यांनी उघडपणे युद्ध पुकारले आहे.
- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांचे वैरत्व टोकाच्या पातळीवरचे आहे.
- जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील जिल्हा बँकेची चौकशी लावून त्यांनी स्वपक्षीय भाजप नेत्यांचीही नाराजी ओढावून घेतली.
भाजपअंतर्गत पडळकरांविषयी नाराजी
वंचित बहुजन आघाडीत असताना पडळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहाल टीका केली होती. आता ते भाजपमध्ये असले तरी निष्ठावान भाजप नेत्यांमध्ये त्याचा राग आजही कायम आहे. याशिवाय जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात चालणाऱ्या जिल्हा बँकेची चौकशी त्यांनी लावल्यानेही भाजपमधील आजी, माजी आमदार नाराज आहेत. या चौकशीत भाजप नेत्यांच्या संस्था असल्याने ही नाराजी आहे.