सांगली/मुंबई - जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या प्रकरणात एका कार्यकर्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त उभारला. याप्रकरणी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगली येथे होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या चिघळले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखत असून आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा कुठल्याच घटनेशी संबंध नव्हता, शरद पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा मला संपविण्याचा कट आहे. मी दिघंचीला चाललो होतो, माझ्यावर अचानक दगड काठ्यांनी भ्याड हल्ला करण्यात आला. हिंमत असेल तर सांगून प्रयत्न करावा, मी सुखरुप आहे, असे गोपचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
पोलिसांची फौज तैनात
आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात असून पोलिसांनी आपली कुमक वाढवली आहे. या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. जखमी राजू जानकर यांनी आमदार पडळकर यांच्यावर शिवीगाळ करत दुखापत केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
२५ ऑक्टोबर रोजी निवडणूक
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २५ ऑक्टोबर रोजी पार असून, तर ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी आहे.