लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडीतील ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी यांच्या भोंदूगिरीच्या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी मांडून संजय गेळे यांच्यावर कडक कारवाई करावी व त्याच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेळे बंधूंच्यावर कारवाई करून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले. आटपाडी शहरातील वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात धर्मांतराच्या उद्देशाने घुसून त्यांनी केलेल्या भोंदूपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी, काल गुरुवारी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून गेळेच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली. तर, आटपाटीत गेळे बंधूनी बेकायेशीर धर्मांतर आणि चर्च बांधकाम झाल्याचेही सभागृहात सांगितले. पडळकरांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.
तत्पूर्वी, लक्षवेधी मांडताना पडळकर म्हणाले की, आटपाडीत संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा आणि भोळेपणाचा फायदा घेत आहेत. त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आटपाडीत बेकायदा चर्च बांधले आहे. धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे. गेळे कुटुंबियाकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलँड मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली.