विटा : विट्याहून आळसंदकडे येणारी कार आणि आळसंदहून विट्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद कुंडलिक पडळकर हे गंभीर जखमी झाले.
या अपघातात त्यांच्या कारमधील चंद्रकांत पावणे, हरी पावणे, जगन्नाथ पडळकर, मोहन सर्जे (सर्व रा. पडळकरवाडी, विभूतवाडी, ता. आटपाडी) या चार कार्यकर्त्यांसह टेम्पो चालक राहुल भीमराव सुर्वे (रा. खंबाळे-भा.) असे अन्य पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास खंबाळे ते आळसंद रस्त्यावर विराज साखर कारखान्यासमोर झाला. ब्रह्मानंद पडळकर हे कार्यकर्त्यांसह आळसंद येथील मंगल कार्यालयात खंबाळे येथील एका कार्यकर्त्याच्या बहिणीच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी त्यांच्या गाडीतून निघाले होते. त्यावेळी आळसंदहून विट्याकडे येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोरून जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांचे हात व पाय फॅक्चर होऊन गंभीर झाले आहेत. तसेच टेम्पो चालक राहुल सुर्वे यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमींना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी टेम्पो चालक राहुल सुर्वे याच्याविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.