सांगली : महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती; पण या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणे या बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेत सुधारणा केली आहे. नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी जिल्ह्यातून १५९ प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना एक कोटी ८२ लाख रुपये शासनाने दिले आहेत.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाणार आहे. अपघातात दोन अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये, तर एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.या याेजनेसाठी जिल्ह्यातून १५९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी ९१ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रुपयांचे वाटप केले आहे. सात शेतकऱ्यांचे प्रस्ताव समितीने नाकारले आहेत. ६१ प्रस्ताव कृषी विभागाकडून कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पात्रता काय?
- ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र
- नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील एक सदस्य योजनेसाठी अर्ज करू शकतात
- घेण्यासाठी अर्जदार हा १० ते ७५ या वयोगटातील असावा.
हे अपघात लाभासाठी पात्ररस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश व विंचूदंश, जनावर चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेचा लाभ मिळणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना एप्रिल २०२३ पासून सुरू आहे. या योजनेसाठी १५९ प्रस्ताव आले असून, ९१ प्रस्ताव मान्य करून त्यांच्या कुटुंबीयांना लाभ दिला आहे. उर्वरित प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी