बैल सांभाळणं जिकिरीचंच
गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल उमदे आणि चपळ. बैलांच्या संवर्धनासाठी या शर्यती भरवल्याचं शेठ सांगतात. पण यातून संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडं नाही. मुळात सध्या सामान्य शेतकऱ्याला बैल सांभाळणं परवडत नाही. रोजचा पाच-सहाशेचा खर्च. शर्यतीचं खोंड असेल तर तोच खर्च दीड-दोन हजारावर जातो. केवळ तालेवार शौकीनच सध्या शर्यतीचे बैल सांभाळू शकतो. त्यांची संख्या तुटपुंजीच. शिवाय शर्यतीच्या खोंडाला शेतीच्या कामाला जुंपत नाहीत. असं असेल तर शर्यतींतून गोवंश संवर्धन कसं होणार? केवळ मूठभर बैलमालक, चालक आणि शर्यतींच्या आयोजकांचं हित जपण्यासाठी हा खटाटोप!
बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नाहीच !
मुळात बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नव्हे, तर काहीतरी वाहून नेण्यासाठी, ओढण्यासाठी असल्याचं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंय. मोहोंजोदडो-हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा इतिहासही तेच सांगतो.
तामिळनाडूत जल्लीकट्टूला परवानगी कशी?
तामिळनाडूने जल्लीकट्टू हा शर्यतीचा प्रकार प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा केला. जल्लीकट्टू म्हणजे बैलाला चिखलात सोडून त्याला आटोक्यात आणण्याची शर्यत. त्यात बैलांना बैलगाडीला जुंपले जात नाही, त्यांचा छळ होत नाही, मारहाण होत नाही. या मुद्द्यांवर तेथे या शर्यतींना परवानगी दिल्याचं प्राणीप्रेमी सांगतात.