विकास शहाशिराळा : शिराळा येथील आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या गोरक्षनाथ पायी दिंडीचा गेली ४१ वर्षांपासून अखंडित भक्तिमय वातावरणात प्रवास सुरू आहे. देवराष्ट्रच्या स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग बाळा वस्त्रे ऊर्फ भडक महाराज यांनी ४० वर्षांपूर्वी ५५ वारकऱ्यांना घेऊन सुरू केलेल्या दिंडीत आता दीड हजारावर वारकरी सहभागी होत असल्याने या दिंडीचा वटवृक्ष झाला आहे. गोरक्षनाथ दिंडी मानाची असून पंढरपूर येथील आषाढी वारीत या दिंडीचा मानाचा प्रथम क्रमांक लागतो.भडक महाराजांच्या सहकार्याने १९८२ ला २० वर्षे खंडित झालेल्या गोरक्षनाथच्या पायी दिंडीचा ५५ वारकऱ्यांसह पुन्हा प्रारंभ झाला. ते वारकरी पालखी खांद्यावरून घेऊन निघाले. साहित्यासाठी सोबत नारायण नलवडे यांची बैलगाडी होती. सलग दोन वर्षे बैलगाडी होती. त्यांतर पाच वर्षे शिराळ्याच्या वसंत शहा यांचा ट्रक होता. त्यानंतर शिराळा मल्लापा कानकात्रे व त्यांचा मुलगा केशव कानकात्रे हे आपला ट्रक आजपर्यंत अखंडित घेऊन जात आहेत.दिंडीची सुरुवात गोरक्षनाथ मंदिरापासून होते. शिराळा येथील हनुमान मंदिरात नायकूडपुरा येथे पहिला मुक्काम होतो. त्यानंतर अंबामाता मंदिर, इस्लामपूर, देवराष्ट्रे सागरेश्वर, बेलवडे विठ्ठलमंदिर, चितळी विठ्ठल मंदिर, कुकुडवाड हनुमान मंदिर, म्हसवड कानफटी मठ, पिलीव हनुमान मंदिर, भाळवणी चौंडेश्वरी मंदिर, भंडी शेगाव, कवडेमळा वाखरी असा मुक्काम करीत शेवटी पंढरपूर येथील भागवत सांप्रदायिक सेवा मंडळ, ३२ शिराळा नायकूडा यांच्या मठात दिंडीचा शेवटचा मुक्काम होतो. द्वादशीनंतर दिंड्या माघारी येतात.दिवसेंदिवस दिंडीच्या सेवासुविधांत बदल होऊ लागला आहे. आता दिंडीसोबत सजवलेला गोरक्षनाथ रथ असतो. आमदार मानसिंगराव नाईक यांनी रथ दिला असून, भगतसिंग नाईक यांनी लाइटसाठी जनरेटर दिला आहे. गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनाथ महाराज हे दिंडीचे चांगले नियोजन करीत आहेत. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देत आहेत.शिराळा येथील बसस्थानकासमोर अश्वरिंगण सोहळा साजरा करून दिंडी पंढरपूरकडे रवाना होते. कांदे, सागाव, मांगले, बिळाशी, साळशी, पिशवी, सरुड, आरळा, सोनवडे, शित्तूर, वाकुर्डे, पाडळी, अंत्री या गावांतूनही छोट्या-मोठ्या दिंड्या जात असतात.
सांगलीतील शिराळा येथील गोरक्षनाथ पायी दिंडीचा ४१ वर्षांपासून अखंडित प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 4:06 PM