शिराळा : येथील गोरक्षनाथ यात्रा १६ ते २२ एप्रिल दरम्यान भरणार आहे. यात्रेसाठी राज्य-परराज्यातून दिंड्या येतात. यात्रेनिमित्ताने आयाेजित कुस्ती मैदानाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.
यात्रेसाठी दिवाबत्ती, पाणी, जागावाटप तसेच विविध सुविधा पुरविण्याबाबत मुख्याधिकारी योगेश पाटील, मठाधिपती पारसनाथजी महाराज व आनंदनाथ महाराज यांनी आढावा घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्व पक्ष संघटनांचे कार्यकर्ते यात्रेनिमित्ताने एकत्र आले आहेत. शहरात तसेच मंदिर परिसरात स्वागत कमानी, फलक उभारण्यात आले आहेत.
या यात्रेसाठी विविध विभागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील तसेच गावातील साफसफाईचे काटेकाेर नियाेजन करण्यात आले आहे. फिरत्या शाैचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात आली आहे. दिवाबत्ती व्यवस्थेसाठी थ्री फेज वीजपुरवठा जाेडण्यात येणार आहे. मक्तेदार नेमून सार्वजनिक तसेच स्टॉलधारकांसाठी दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर व मंदिर परिसरातील विद्युत दिव्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रेकरुंना टीसीएलयुक्त शुद्ध पाणीपुरवठा हाेईल याची काळजी घेतली जात आहे.
खाद्यपदार्थांचे गाडे, खेळणी, मिठाई, हॉटेल व अन्य दुकाने, पाळणे लावण्यासाठी जागावाटप करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान नगरपंचायत नियंत्रण कक्ष, आरोग्य पथक कक्ष, पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. यात्रेकरुंना दर्शनाला जाण्यासाठी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. यात्रेमध्ये ध्वनिक्षेपक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आग प्रतिबंधक उपाय म्हणून अग्निशामक गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.