सांगली : तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ मोटार व दुचाकीच्या अपघातात नितीन बाळकृष्ण कोकणे (वय २७, रा. घोसरवाड, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील ओंकार शिवाजी कोकणे (२७) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता घडला.
घोसरवाड येथील नितीन कोकणे व त्याचा चुलत भाऊ ओंकार हे दोघेजण दुचाकीवरून (क्र. एमएच ०९, डीएन ४३) इस्लामपूरकडे निघाले होते. नितीन हा शेती करीत होता. कडकनाथ कोंबड्यांचा प्रकल्प उभा करण्यासाठी हे दोघेजण अॅडव्हान्स देण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडले. सांगलीमार्गे ते इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांच्यासोबत आणखी दोघे मित्र दुसऱ्या दुचाकीवर होते. ते दोघे मित्र पुढे निघून गेले व नितीन आणि ओंकार हे दुचाकीवरून तुंगजवळील मिणचे मळ्याजवळ आले असता, त्यांच्या दुचाकीला मोटारीने (क्र. एमएच १०, के ०१०९) धडक दिली. यात नितीन हा मोटारीच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच ठार झाला, तर ओंकार गंभीर जखमी झाला. या दोघांसोबत असलेले त्यांचे मित्र पुढे थोड्या अंतरावर जाऊन त्यांची वाट पाहत होते. तोपर्यंत रस्त्यावरून जाणाºयांनी त्यांना अपघात झाल्याचे सांगितले. नितीन व ओंकार या दोघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी नितीनला मृत घोषित केले. ओंकार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मिरज मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारातच हंबरडा फोडला. रात्री शवविच्छेदनानंतर नितीनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.अपघातांची मालिका सुरूचसांगली-तुंग रस्ता अत्यंत खराब आहे. वारंवार आंदोलने करूनही रस्त्याच्या दुरूस्तीत हयगय सुरू आहे. या रस्त्याने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. मंगळवारी याच रस्त्यावर कसबे डिग्रज येथे एसटी पलटी होऊन २५ प्रवासी जखमी झाले होते, तर बुधवारी तुंगजवळ एक ट्रकही पलटी झाला. त्यानंतर झालेल्या अपघातात नितीनचा बळी गेला. या रस्त्यावरील अपघातांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.