सांगली : सांगलीसाठी गुरुवारी कोरोना लसीचे २० हजार १०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी सर्वत्र लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे व लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी ही माहिती दिली.
आठवडाभरापासून मंद गतीने सुरू असणाऱ्या लसीकरणाला यामुळे गती येणार आहे. डॉ. पोरे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपासून लसींचे वितरण जिल्हाभरात केले जाईल. महापालिका, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांना लस दिली जाईल. त्यामुळे सकाळपासून टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू होईल.
या डोसमधून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्याशिवाय ४५ वर्षांवरील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. ४५ वर्षांवरील व्यक्तींचे पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झाले असतील तरच दुसरा डोस मिळेल. अन्य नागरिकांना लस मिळणार नाही. लसीकरण केंद्रामध्ये नोंद केलेल्या व्यक्तींना उपलब्धतेनुसार लस मिळेल. मोठ्या प्रमाणात लस मिळाल्याने सर्व म्हणजे २६७ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी बहुतांश केंद्रांवर लसीकरण बंदच राहिले. उपलब्ध साठ्यातून दिवसभरात फक्त ४१६ जणांना लस मिळाली. जिल्ह्याचे एकूण लसीकरण ७ लाख ६ हजार १६५ इतके झाले.