सांगली - राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंनी मोठं बंड केल्यानंतर शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांसोबत किंवा एकनाथ शिंदेंसोबत एखादा नेता दिसून आल्यास राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगतात. त्यातच, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदे गटाकडूनही पक्षात प्रवेश करुन घेण्यासाठी नेतेमंडळींना गळ घालण्यात येत आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एकनाथ शिंदेंसोबत माजी खासदार राजू शेट्टी यांचे फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाळव्याच्या रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्यांने प्रोत्साहन अनुदान जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा एकत्रित फोटो असलेला बॅनर झळकावला आहे. या बॅनर वर एकदम ओके, पन्नास हजार रुपये मिळाले, जाहीर आभार... असा आशयही लिहण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्याने लावलेल्या या बॅनरची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेग्युलर कर्जधारकांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचे कबूल केले होते. सरकार जात असताना घाई गडबडीत याची घोषणाही करण्यात आली होती. पण, त्यांची फक्त घोषणाच राहिली. तत्पूर्वी राजू शेट्टींनी परिक्रमा पंचगंगेची ही यात्रा सष्टेबर २०२० साली काढली होती. त्यामध्ये, प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी अशी १५० किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढूनसुद्धा सरकार दखल घेत नव्हते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने १५० रूपये प्रती गुंठा देऊन पुरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यानंतर १३ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर वर भर पावसाळात मोर्चा काढण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीपूर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते. आता, शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. त्यामुळे राजु शेट्टी यांच्या लढ्याला यश आल्याची चर्चा होते. त्यातूनच ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.