मिरजेत महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक १० येथे लस टोचून घेण्यासाठी अशी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शनिवारच्या विश्रांतीनंतर रविवारी जिल्हाभरात कोरोना लसीकरणाची एकच धांदल उडाली. लस घेण्यासाठी तोबा गर्दी झाल्याचे सर्रास केंद्रांवर पाहायला मिळाले. दिवसभरात २५ हजारहून अधिक लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली.
रविवारी पहाटे ५५ हजार डोस घेऊन व्हॅन सांगलीत आली, दिवसभरात त्यातील २५ हजार डोस संपलेदेखील. आरोग्य विभागाने सकाळी लवकरच लसींचे वितरण सुरु केले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आणि महापालिकेला सकाळी लवकरच लस वितरित केली. महापालिकेला सात हजार डोस दिले. त्यामुळे सकाळी नऊपासूनच अनेक ठिकाणी लसीकरण सुरु झाले. रविवारची सुट्टी असल्यानेही गर्दी झाली. जिल्हाभरात २६७ केंद्रांवर लस टोचण्यात आली.
कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर बहुतांश केंद्रांवर लस संपली होती. शनिवारी अवघे २,२४३ लसीकरण झाले. त्यामुळे लसीच्या प्रतीक्षेतील नागरिकांनी रविवारी लस टोचून घेण्यासाठी रांगा लावल्या. शहरी व ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी नागरिकांसाठी वाहनांची सोय केली होती. केंद्रांवर गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेकांनी मास्कही लावले नव्हते.