सांगली : प्रतिकूल हवामानामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याला केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य शासन स्वतंत्रपणे मदत करेल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. डाळिंब बागायतदारांना मदत करण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाने मदतीची भूमिका स्वीकारली आहे. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत मदत देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मदत देण्याचे काम सुरू आहे. विभागनिहाय मदतीची तुलना करण्यापेक्षा नुकसानीच्या वस्तुस्थितीची पाहणी करून मदत देण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाल्याने त्याठिकाणी अधिक मदत दिली आहे. सांगली जिल्ह्यातील डाळिंबांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. सांगली शहरातील वसंतदादा स्मारकाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. ३१ मार्चपूर्वी स्मारकासाठीचा सर्व निधी खर्च करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्मारकासाठी आणखी केवळ १ कोटी रुपये कमी पडतील. तो निधीही तातडीने पुरविला जाईल. हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून खराब रस्ते व पावसाळ्यात नेहमी खराब होणारे रस्ते यांची यादी आम्ही मागविली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये पुन्हा बैठक घेऊन अशा रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचे निर्णय घेतले जातील. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही आम्ही त्या बैठकीला बोलावणार असून, ज्या भागात बस जात नाहीत त्याठिकाणी बससेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतले जातील. एसटीच्या अन्य प्रश्नांवरही आम्ही निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राज्याच्या सहकार विभागाचे संकेतस्थळ अधिक अपडेट करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सहकार विभागातील दैनंदिन घडामोडी, शासनाचे आदेश, राज्यातील विभागांशी संबंधित आकडेवारी व अन्य माहिती या संकेतस्थळावर तात्काळ उपलब्ध व्हावी, यादृष्टीने पावले टाकली जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
शासन स्वतंत्रपणे शेतकऱ्यांना मदत करेल
By admin | Published: January 23, 2015 12:26 AM