कडेगाव : राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. वर्षभरातील शासनाचा कारभार अत्यंत निराशाजनक आहे. शासन जनतेला गृहीत धरून चालत नाही, हे कोल्हापूरच्या निकालावरुन शासनकर्त्यांना समजले असेल, अशी टीका माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत केली.कदम म्हणाले की, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन भाजपने मते मिळविली, परंतु दुष्काळप्रश्नी या शासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाबाबत शासन उदासीन आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजनांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. महागाई वाढली आहे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांच्या वाट्याचे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून उचललेच पाहिजे. नाही तर या योजनांच्या लाभक्षेत्रातील कायम दुष्काळी भागातील जनता कधीही माफ करणार नाही. म्हैसाळपासून जवळच कर्नाटकात कृष्णेचे पाणी जाते. यातील या तिन्ही योजनांच्या वाट्याचे पाणी दुष्काळात संबंधित लाभक्षेत्राला देणे शासनाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर आघाडी सरकारवर टीका केली होती. आघाडीच्या काळात बड्या मंत्र्यांच्या मतदार संघात भरघोस निधी दिला आणि अन्य मतदारसंघ वंचित राहिले, असे ते म्हणाले होते. याबाबत बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, शासनाचा निधी नियम व कायद्यानुसारच वापरावा लागतो आणि या नियम व कायद्यानुसारच विविध कामांसाठी निधी मिळविला होता. मुख्यमंत्र्यांनी खूप जबाबदारीने बोलण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. (वार्ताहर)
शासनाचा वर्षभरातील कारभार निराशाजनक
By admin | Published: November 02, 2015 10:57 PM