बोरगाव : महापूरबाधितांच्या घरातील चुलीत पाणी गेले तरच शासन मदत देणार काय? हा अन्याय ताबडतोब थांबवा, अन्यथा शेतकरी संघटना तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा वाळवा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.
ते म्हणाले की, जुनेखेड गावाला पाण्याने वेढा दिला होता. शंभर टक्के गाव विस्थापित झाले होते. शेती, व्यापार यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, तलाठी, मंडल अधिकारी बाधित कुटुंबांवर अन्याय करत आहे. महापुराचे पाणी उंबऱ्याच्या आत हवे, दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यास मदत मिळणार नाही, पाणी समोरूनच यायला हवे, गटारी अथवा चेंबरमधून नको, अशी अनेक कारणे समोर करत अन्याय चालवला आहे. या अटी लावून, गावात तोंडे पाहून पंचनामे केले गेले. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे घराच्या वरच्या मजल्यावरील व विभक्त कुटुंबात स्वतंत्र शिधापत्रिका असणाऱ्यांनाही वेगवेगळी सानुग्रह मदत द्यावी, अन्यथा तलाठी कार्यालय उघडू देणार नाही. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अन्यथा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू.