सांगली : जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या शासकीय रुग्णालयातील दोन प्रकल्प मार्गी लागल्याने सामान्य लोकांना, रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गाडगीळ म्हणाले की, राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. नुकताच मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेतलेल्या कुंटे यांची अधिवेशन काळात मी भेट घेतली. सांगलीच्या रुग्णालयाबाबत माहिती दिली. त्यानुसार कुंटे यांनी सांगली जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ९३ कोटी रूपयांचे विविध प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत.
सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय परिसरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील २९ एकर जागा उपलब्ध असून, याठिकाणी १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रूग्णालय बांधण्यासाठी २०१३मध्ये मान्यता मिळाली होती. तथापि, या प्रकल्पासाठी २०१८पासून वारंवार पाठपुरावा करत आहे. आता प्रकल्प मार्गी लावला आहे. सांगली जिल्ह्यातील या प्रश्नांबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्य सचिव कुंटे यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात असणाऱ्या मोकळ्या जागेत ४५ कोटी ९३ लाख रूपये अंदाजित खर्चाचे १०० खाटांचे (तळमजला व २ मजले असे ७ हजार ६६३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे) जिल्हा रूग्णालय व पोस्टमार्टम रूम बांधण्याचा प्रकल्प, ४६ कोटी ७३ लाख रूपये अंदाजित खर्चाचे १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रूग्णालय व धर्मशाळा बांधकाम करणे (तळमजला व २ मजले असे ८ हजार ७८६ चौरस मीटर क्षेत्रफळाची) कामे मंजूर केली आहेत.
अंदाजित खर्चाच्या श्रेणीवर्धन करण्याच्या कामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.