लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन मिळावे, थकीत भविष्यनिर्वाह निधी जमा करावा आदी मागणीचे निवेदन संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष महेशकुमार कांबळे, उपाध्यक्ष शरद सातपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. कांबळे म्हणाले की, सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय व मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये कंत्राटी १३० सफाई कर्मचारी काम करत आहेत. सूर्या सेंटर ट्रिटमेंट कंपनीच्या वतीने त्यांची कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. या संस्थेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तसेच त्यांना किमान समान वेतन कायद्यांतर्गत वेतन दिले जात नाही. या कंपनीने गेल्या दहा ते अकरा महिन्याचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा केला नाही. कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देतो, असे आमिष दाखवून काम करून घेतले. पण योग्य तो मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे या कंपनीची चौकशी करून कारवाई करावी. त्यांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना १२० कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवदेन देण्यात आले.