सांगली : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेली व्हेंटिलेटर्स दुरूस्तीअभावी बंदच आहेत. मिरज कोविड रुग्णालयात असलेली किमात २० व्हेंटिलेटर्सची अशी स्थिती असून, सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील इतर महागळ्या उपकरणांचा मात्र कोरोना बाधितांसह ‘नॉनकोविड’ रुग्णांसाठी नियमित वापर सुरू आहे. शासकीय रुग्णालयातील इतरही वापराविना पडून असलेल्या उपकरणांचा वापर होणे आवश्यक आहे.
कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर बनत असल्याने उपचार घेणारी रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून शासकीय रुग्णालयावरील ताणही वाढला आहे. त्यामुळेच प्रशासनाने मिरज शासकीय रुग्णालयास कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला आहे; तर सांगलीत नॉनकोविड उपचारास प्राधान्य देण्यात येत आहे.
कोरोनामध्ये अत्यवस्थ झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची मदत होते. व्हेंटिलेटरचे उपचार मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करताना दिसून येतात. अशावेळी बंद असलेले हे व्हेंटिलेटर दुरूस्त झाल्यास मदत होणार आहे.
चौकट
इतर उपकरणांसह सज्ज यंत्रणा
शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, एक्सरे, डायलेसिससह इतर उपकरणांसह सज्ज यंत्रणा आहे, तर रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन बेड व आयसीयुमध्ये व्हेंटिलेटर बेडची सोय आहे. मात्र, सध्या २० व्हेंटिलेटर्स बंद आहेत.
चौकट
कोरोनावरील उपचारात शासकीय रुग्णालयाची कामगिरी सरस असल्याने अनेक बाधितांचे नातेवाईक बाधितांना शासकीय रुग्णालयातच दाखल करण्यास प्राधान्य देत आहेत. अशा स्थितीत बंद असलेल्या व्हेंटिलेटरमुळे अडचणी येत आहेत.
चौकट
खासगी रुग्णालयातील दर न परवडणारे
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सोय असलेली खासगी रुग्णालये सज्ज असली, तरी त्यांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच उपचार व्हावेत, यासाठी अनेक प्रयत्नशील असतात.
चौकट
बंद व्हेंटिलेटरमुळे अडचणी
मिरज कोविड रुग्णालयात सध्या ३५१ बेडची सोय आहे. गेल्यावर्षी पीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरपैकी २० अद्यापही बंद अवस्थेत आहेत. याची दुरूस्ती झाल्यास अथवा कंपनीकडून बदलून मिळाल्यास रुग्णांची सोय होणार आहे.
कोट
शासकीय रुग्णालयातील उपकरणांचा नियमित वापर सुरू आहे. तरीही वापर होत नसलेल्या अथवा दुरूस्तीअभावी बंद असलेल्या उपकरणांची दुरूस्ती लवकरच करून घेण्यात येईल. वैद्यकीय उपकरण बंद आहेत, म्हणून उपचारावर परिणाम झाला, असे झालेले नाही.
डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक