आटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या ९४९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात एकाही शासकीय रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. तालुक्यात शासकीय आरोग्य विभागात एकही एमडी डॉक्टर नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांना थेट तासगाव, सांगली, मिरज गाठावे लागत आहे. आतापर्यंत ८९ जणांचे बळी गेले आहेत.
तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात केवळ २५ ऑक्सिजन बेड आहेत. ते कायम भरलेले असतात. विशेष म्हणजे तालुक्यात खासगी रुग्णालयात १६१ बेड आहेत. त्यापैकी सहा व्हेन्टिलेटर बेड आहेत. एकूण रुग्णांच्या ८० टक्के रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपचारावर आहेत. बरेच डॉक्टर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण अपुऱ्या औषधांअभावी, चाचणीच्या कीटच्या तुटवड्याने त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाचा अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेतून यायला ३ ते ८ दिवस जातात. मधल्या काळात रुग्ण गावभर फिरतो. त्यामुळे संख्या वाढली. त्यामुळे गावेच्या गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनत चालली आहेत. शासकीय यंत्रणा तोकडी पडल्याने अनेक गावांत स्वतःहून लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर उभा केली जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते लोकसहभागातून गोळ्या-औषधे आणि अन्नाची सोय करीत आहेत. दिघंची, झरे, शेटफळे, राजेवाडी, हिवतड, घरनिकी या गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
चौकट
एका बेडसाठी दहा नेत्यांचे फोन!
आटपाडीतील ग्रामीण रुग्णालयात २५ बेड आहेत. तिथे एका-एका बेडसाठी दररोज अनेक नेत्यांचे फोन येतात. डॉक्टरांवर दबाव आणला जातो. पण बेड, व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यश आलेले नाही. मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारेपर्यंत दहा नेत्यांचे फोन येतात.
चौकट
गावेच्या गावे हॉटस्पॉट!
गावे आणि सध्याची रुग्णसंख्या
: आटपाडी १७७५, दिघंची ९९९, निंबवडे ३६६, राजेवाडी १९४, शेटफळे ३९४, करगणी १६९, लिंगिवरे ११६, आवळाई १६४, वाक्षेवाडी १३७, हिवतड १६७, झरे ११७, खरसुंडी १२१.
कोट
तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. पोलिसांची संख्यासुध्दा कमी आहे. ५६ गावे आणि ४२ पोलीस कसे नियंत्रण करणार? नागरिकांनी स्वतःहून नियम पाळण्याची गरज आहे.
- सौ. वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी