वाळवा : वाळवा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, म्हणून २५ मार्च १९८६ ला तत्कालीन आमदार क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रयत्न केले होते. ते त्यावेळेस मंजूरही झाले. परंतु ६ मार्च १९८७ ला सार्वजनिक आरोग्य विभागाने याला स्थगिती दिली. तेव्हापासून आजअखेर पाठपुरावा केल्याने ३१ जानेवारी २०१९ ला मंजुरीचे शासनाचे पत्र मिळाले आहे, अशी माहिती हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, वाळवा तालुक्यातील विविध संस्था, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधींकडून तत्कालीन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना वाळवा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी सातत्याने ३४ वर्षे पत्रव्यवहार सुरू होता. वाळवा औद्योगिक केंद्र आहे, हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच वाळवा आणि परिसरातील खेडेगावांतील गोरगरीब जनतेला याचा लाभ होणार आहे. यामुळे केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ फायदेशीर ठरणार आहे. याचा विचार करून पुन्हा २०१६ ला नवीन प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावाची दखल या शासनातील जलसंधारण पाटबंधारेमंत्री विजय शिवतारे यांनी घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे वाळवा ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी तगादा लावला. ही मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उचलून धरली.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पाटबंधारेमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सहकार्याने ३१ जानेवारी २०१९ ला आरोग्य भवनातून या ग्रामीण रुग्णालयास मंजुरीचे अधिकृत पत्रच मिळाले आहे.तातडीने कामकाज सुरू व्हावेग्रामीण रुग्णालयासाठी सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उपलब्ध जागा पुरेशी आहे. त्यामुळे तातडीने कामाला प्रारंभ करून गोरगरिबांना त्याचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी अपेक्षा वैभव नायकवडी यांनी व्यक्त केली.