इस्लामपूर : प्रकाश हॉस्पिटलमधील डायलेसिस उपचार वगळता महात्मा फुले योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व आरोग्यसेवा शासनाकडून स्थगित करण्यात आल्या आहेत. रुग्णसेवा आणि आरोग्य शिक्षणात राजकारण असू नये, मात्र जबाबदार पदावर असणाऱ्या मंत्र्यांकडून हे लाभ जिल्ह्यातील जनतेला मिळू नयेत यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. येत्या एका महिन्यात ही स्थगिती उठवली नाही, तर सर्वपक्षीय जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, महात्मा फुले आरोग्य योजना केंद्र आणि राज्य शासनाने गरीब, गरजू रुग्णांसाठी सुरू केली आहे. त्यामध्येही येथील मंत्री राजकारण करत आहेत. हॉस्पिटलचे रेकॉर्ड सर्वप्रकारे काटेकोरपणे तपासण्यात आले आहे. मात्र मंत्र्यांचा पाय आडवा असल्याने अंतिम मंजुरी दिली जात नाही. ती तात्काळ द्यावी.
ते म्हणाले, कोरोनाच्या काळातही या मंत्र्यांच्या दबावामुळे अडचणी निर्माण करण्यात आल्या. येथील सर्व बेड ऑक्सिजन सुविधेने परिपूर्ण होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे हॉस्पिटल कोविडची सेवा देत राहिले. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने ही योजना सुरू करावी.
यावेळी डॉ. उदयसिंह नाईक, धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत उपस्थित होते.
चौकट
आठ रुग्ण दगावले
प्रकाश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आधार ठरलेल्या महात्मा फुले योजनेस फेब्रुवारी महिन्यात स्थगिती दिली गेली. यावेळी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे रुग्ण या योजनेतून मोफत उपचार घेत होते. मात्र योजना बंद झाल्यानंतर यातील आठ रुग्ण उपचाराअभावी दगावले. संतप्त नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आत्मदहनाचा इशारा दिल्यावर, याठिकाणी फक्त डायलेसिसचे उपचार या योजनेतून सुरू आहेत, असे निशिकांत पाटील यांनी सांगितले.