सांगली : कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र कोरोनाचा आलेख वाढत आहे. परिस्थिती ंिचंताजनक आहे. अशा काळात योग्य नियोजन हवे. महापालिकांना याकामी विशेष निधी देणे, जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच अन्य योजनांमधून जिल्हानिहाय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.
राज्यभरातील अनेक गोरगरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रेमिडेसीवीर इंजेक्शनच्या सहा डोसची किंमत ३५ हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ते मोफत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.
प्रत्यक्षात आता प्रशासकीय स्तरावर तसेच रुग्णालयांना त्यांनी या औषधाचा डोस मोफत दिला जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना या औषधाची गरज आहे त्यांना ते मिळत नसल्याचे दिसून येते.