सांगली : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणायला हवा, त्यासाठी समाजाने नेतृत्वाचा अभिमान न बाळगता एकत्र आले पाहिजे, असे आवाहन भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. आरक्षण देण्यात सरकार कमी पडल्याचा आरोपही त्यांनी केला.
सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, केदार खाडिलकर, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील आदी उपस्थित होते.
घाटगे म्हणाले, आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले, त्यामुळे त्यावेळच्या सरकारवर दबाव आला. सध्याच्या सरकारवर तसा दबाव पुन्हा निर्माण केला पाहिजे. यासाठीच पश्चिम महाराष्ट्रात संपर्क दौरा सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाला मागासवर्गीय आयोग कळलाच नाही, त्यामुळे आयोगाची पुन्हा स्थापना आणि पुनर्विचार याचिका यासाठी सरकारवर दबाव आणायला पाहिजे. त्यासाठी आपसातील नेतृत्वाचा आग्रह बाजूला ठेवूया. आम्ही बाजूला बसू; पण आरक्षण मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
ते म्हणाले की, समाजातील २१८५ विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना तातडीने नियुक्ती पत्रे देणे गरजेचे आहे. पुढील परीक्षांचे वेळापत्रकही जारी केले पाहिजे. दबाव आणल्याशिवाय हे शक्य नाही.
चौकट
समाजातील नेत्यांची बैठक
समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख संघटना, नेत्यांची बैठक घेऊन आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी नितीन चव्हाण, राहुल पाटील, सतीश साखळकर, योगेश सूर्यवंशी, विलास देसाई, विजय धुमाळ, नेताजी सूर्यवंशी, श्रीकांत शिंदे, पृथ्वीराज पवार, दिनेश कदम, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.