लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाने लॉकडाऊन काळात जाहीर केलेली आर्थिक मदत गोरगरिबांपर्यंत पोहचणारी नाही. त्यामुळे थेट गोरगरीब जनतेला शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष बादशहा पाथरवट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. यात म्हटले आहे की, गरिबांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली, मात्र ती मदत दारिद्र्य रेषेखालील गरिबांना की, अन्य गरिबांना याचा उल्लेख नाही. त्यामुळे सर्व रेशनकार्डधारकांना ३ किलो ऐवजी ५ किलो गहू, तांदूळ वाटप व्हावे. नोंदणीकृत बांधकाम कामगार, घरेलू कामगार, अधिकृत फेरीवाले, परवानाधारक रिक्षाचालक यांना दीड हजार रुपये मदत देण्यात येणार आहे, मात्र असंघटित कामगार, मजूर, नोंदणीकृत नसलेलेे बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, परवाना नसलेले रिक्षाचालक या सर्वांना सुद्धा मदत मिळणे आवश्यक आहे. काही दुकानदार व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते ११ ही वेळ दुकान उघडण्यासाठी दिली आहे. ही वेळ पुरेशी नाही. यात वाढ करावी व सकाळी ७ ते २ अशी वेळ व्यवसायास द्यावी, अशी मागणी बादशहा पाथरवट यांनी केली आहे.