सांगली : राज्य शासनाने पूरग्रस्त लोकांसाठी व विविध प्रकारच्या नुकसानीकरिता जाहीर केलेली भरपाई अत्यंत कमी आहे. नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू, असे आश्वासन अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी पूरग्रस्तांना दिले.
मातोंडकर यांनी बुधवारी दुपारी सांगलीवाडीतील शाळा क्र. ९ मधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन केंद्रास भेट दिली. महिलांशी संवाद साधला. ‘मी अभिनेत्री किंवा राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर महाराष्टची मुलगी म्हणून तुम्हा सर्वांना भेटायला आली आहे. तुमच्या सुख-दु:खात मी सहभागी आहे’, अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला. तेथे त्यांनी कीटचे वाटप केले. त्यानंतर मातोंडकर यांनी सांगलीच्या गणपती पेठेतील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. दुकानात जाऊन त्यांनी झालेली हानी पाहिली. नुकसानीचे चित्र भयंकर असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पूरग्रस्तांशी त्यांनी चर्चा केली.
संकट कोसळलेल्या येथील लोकांच्या चेहºयावर मला पाहून हसू फुलले, यात मी समाधानी आहे. त्यांच्या आयुष्यातील आनंद कुणीही हिरावून घेऊ नये, अशी भावना मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रवी खराडे, बिपीन कदम, अभिजित भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.ज्याचा त्याचा प्रश्न!मदत कोणी किती करावी, करावी की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्यापरीने मदत व दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.